कान्समध्ये मराठीचा डंका; प्राजक्ता माळीसह दिग्गज कलाकार एकाच फ्रेममध्ये! VIDEO

    दिनांक :17-May-2026
Total Views |
मुंबई/कान्स,
prajakta-mali : फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या अत्यंत मानाच्या अशा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या रेड कार्पेटवर दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकार आपली हजेरी लावत आहेत. अशातच, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने फ्रान्समधून आपला पहिला खास व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत असून, यात प्राजक्तासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र पाहायला मिळत आहेत.
 
 
 
prajakta-mali
 
 
प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून फ्रान्समध्ये पोहोचल्याचा एक सुंदर व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये प्राजक्ता खूपच आनंदात आणि उत्साहात दिसत आहे. विशेष म्हणजे, या व्हीडिओमध्ये तिच्यासोबत मराठी सिनेविश्वाचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे देखील एकत्र कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील इतके मोठे दिग्गज एकाच फ्रेममध्ये आल्यामुळे चाहत्यांसाठी हा एक मोठा सुखद धक्का ठरला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी आणि कलाकारांनी प्राजक्तावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठी चित्रपटांचा आणि कलाकारांचा मोठा दबदबा पाहायला मिळत आहे. या आंतरराष्ट्रीय मंचावर मराठी संस्कृती आणि सिनेमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही दिग्गज मंडळी फ्रान्सला पोहोचली आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या या पहिल्याच ग्लॅमरस झलकीमुळे आता आगामी दिवसांत या मराठी कलाकारांचे कान्सच्या रेड कार्पेटवरील लुक्स कसे असतील, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.