सीबीएसईत नववीपासून त्रिभाषिक शिक्षणाचा नवा अध्याय

    दिनांक :17-May-2026
Total Views |
दोन भारतीय भाषा शिकणे बंधनकारक

नागपूर, 
Central Board of Secondary Education केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत मोठा बदल करत इयत्ता नववीपासून तीन भाषांचा अभ्यास अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलै २०२६ पासून हा नवा नियम लागू होणार असून विद्यार्थ्यांना तीन भाषांपैकी किमान दोन भारतीय भाषा शिकणे आवश्यक राहणार आहे.
 
cbse
 
राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि नव्या शैक्षणिक आराखड्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये बहुभाषिक कौशल्य विकसित करणे, भारतीय भाषांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक संस्कृतीशी विद्यार्थ्यांचा संबंध अधिक दृढ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना पहिली, दुसरी आणि तिसरी अशा तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल. मात्र तिसऱ्या भाषेसाठी दहावीच्या मंडळ परीक्षेत स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. त्या भाषेचे मूल्यमापन संबंधित शाळांकडून अंतर्गत पातळीवर केले जाईल आणि त्याची नोंद विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रात करण्यात येणार आहे.
मंडळाने स्पष्ट केले की, या नियमामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेला बसण्यापासून रोखले जाणार नाही. शाळांना उपलब्ध विषयसूचीतून भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य राहील, मात्र दोन भारतीय भाषांची अट अनिवार्य असेल. परदेशी भाषा केवळ अतिरिक्त पर्याय म्हणून निवडता येणार आहे.
Central Board of Secondary Education  स्वतंत्र पाठ्यपुस्तके उपलब्ध होईपर्यंत नववीच्या विद्यार्थ्यांना सहावीच्या स्तरावरील पुस्तके वापरावी लागणार आहेत. स्थानिक साहित्य, प्रादेशिक संस्कृती आणि मातृभाषेच्या अध्ययनावर भर देण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.
भाषा शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी शिक्षकांची देवाणघेवाण, ऑनलाइन अध्यापन आणि निवृत्त शिक्षकांची मदत घेण्याचे पर्यायही सुचविण्यात आले आहेत. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि परदेशातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतींची तरतूद करण्यात आली आहे.