छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पार

    दिनांक :17-May-2026
Total Views |
पुसद, 
महसूल विभागाच्या पुढाकाराने आयोजित केलेले Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Campaign छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जुनी पंचायत समिती सभागृह येथे मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या अभियानामध्ये शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध शासकीय योजनांची माहिती घेतली तसेच महसूल व नगर परिषद संदर्भातील अनेक प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात आले.
 
 
Abhiyan
 
शिबिरात एकूण 3140 नागरिक उपस्थित होते, तर 23 विविध विभागांनी सहभाग घेत नागरिकांना तब्बल 4110 लाभांचे वितरण केले. या अभियानामुळे शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोचवण्याचा उद्देश यशस्वी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पुसद नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नप अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी पुसद शहरातील नागरिकांच्या दीर्घकालीन समस्यांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज व्यक्त केली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नप अध्यक्ष मोहिनी नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक नागरिकांच्या घरासंदर्भातील प्रलंबित नमुना ‘ड’ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना आहे.
 
 
 
Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Campaign  यावेळी नप अध्यक्ष मोहिनी नाईक व बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे यांनी 2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना नियमानुकूल करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन आवश्यक अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले. या शिबिरामध्ये नपकडून 19 असेसमेंट नक्कल वाटप करण्यात आले. तसेच जन्म-मृत्यू दाखले, अतिक्रमण नियमाकुलीकरणासाठी अर्ज वितरण व स्वीकृती प्रक्रिया राबविण्यात आली. पुसद नप हद्दीतील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी अध्यक्ष मोहिनी नाईक व मुख्याधिकारी राऊत सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
 
 
या महाराजस्व अभियानात केवळ महसूल विषयक कामेच नव्हे तर विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात आले. शेतकरी आत्महत्या प्रतिबंध, व्यसनमुक्ती, नवीन आधार कार्ड व अपडेट प्रक्रिया, स्वगणना व जनगणना, बँक खाते केवायसी, मतदार नोंदणी, पशुधन उद्योजकता योजना, कोरडवाहू शेतीतील पीक पद्धती तसेच विविध कृषी योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. भोगवटदार वर्ग-2 जमिनी वर्ग-1 करण्याबाबत मंडळ अधिकाèयांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार रेखा वाणी यांनी शेतकरी संवाद साधत महसूल विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाने दुधाळ जनावरे, पक्षीपालन व शेतीपूरक व्यवसायांबाबत माहिती देत ग्रामीण भागातील नागरिकांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. या लोकाभिमुख अभियानाला नगर परिषदेमधील विविध विभागांचे सभापती आणि शहरातील नगरसेवक उपस्थित होते.
अनेकांना अभियानाचा लाभ
प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यात निर्माण झालेल्या संवादामुळे अनेकांना या अभियानाचा लाभ झाला आहे. हेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे यश असल्याचे प्रतिपादन नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी केले.