धुळे,
double-murder-massacre : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शनी अमावस्येच्या पूजेनंतर घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. जैताणे गावातील एका आश्रमात भोंदूबाबाने तरुण आणि तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपी योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे हे दोघे शनी अमावस्येनिमित्त विशेष पूजाविधीसाठी आश्रमात गेले होते. पूजेदरम्यान काही कारणावरून त्यांच्यात आणि भोंदूबाबामध्ये वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने अक्षयच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने हल्ला केला, तर जयश्रीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.
घटना लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकण्याचा प्रयत्न केला. जयश्रीचा मृतदेह रस्त्यालगतच्या शेतात सापडला होता, तर अक्षयचा मृतदेह वनक्षेत्रात पुरल्याचे तपासात उघड झाले. घटनास्थळी सापडलेल्या केसरी रुमालाच्या आधारे पोलिसांनी तपास करत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.