शासकीय जागेचा वापर वैयक्तिक प्रदर्शनासाठी..?
नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण
हदगाव,
Hadgaon Municipal Council हदगाव नगर परिषदेच्या मुख्य दालनात काही राजकीय पद नसलेल्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे करण्यात आल्याची चर्चा सध्या शहरभर रंगलेली दिसून येत आहे. शासकीय कार्यालय परिसरात अशा प्रकारचे वैयक्तिक कार्यक्रम होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नगर परिषद जनतेच्या कामासाठी आहे की वैयक्तिक कार्यक्रमांसाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरामध्ये आधीच विविध नागरी समस्या कायम असताना दुसरीकडे नपच्या मुख्य दालनामध्ये वाढदिवस साजरा झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. संबंधितांकडे कोणते शासकीय पद आहे का, कोणती लोकनियुक्त जबाबदारी आहे का, निवडणूक आयोगाची मान्यता आहे का, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सध्या नपमध्ये महिला नेतृत्व असतानाही प्रत्यक्षात काही पुरुष नेत्यांचीच मक्तेदारी दिसून येत आहे. त्यातूनच नप अध्यक्षांच्या मुख्य दालनात वाढदिवस सोहळा पार पडल्याची बाब चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय आता सार्वजनिक किंवा वैयक्तिक कार्यक्रमांसाठी खुले झाले आहे काय, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
Hadgaon Municipal Council सामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी अनेक वेळा कार्यालयीन प्रक्रियेत अडचणी येत असताना, दुसरीकडे वैयक्तिक कार्यक्रम मात्र थाटाात होत असल्याचे चित्र दिसत आहे. जनतेची कामे रखडतात, पण वैयक्तिक कार्यक्रमांना मोकळीक मिळते, अशीही भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शासकीय जागेचा वापर वैयक्तिक कार्यक्रमासाठी करण्यात आला असेल तर त्यास संबंधित अधिकारी जबाबदार धरले जाणार का, तसेच अशा कार्यक्रमाला परवानगी होती का, याची चौकशी होणार का, असे प्रश्न आता नागरिकांकडून विचारले जात आहेत.
सोबतच, या संपूर्ण प्रकरणात संबंधित मुख्याधिकाèयांची भूमिका काय, कार्यक्रमासाठी शासकीय दालन उपलब्ध करून देण्यात आले होते का, याबाबत कोणती अधिकृत नोंद आहे का, अशीही विचारणा सुरू झाली आहे. या सोहळ्याची प्रशासकीय चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही नागरिकांनी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगानेही याची दखल घ्यावी, अशी मागणी आहे.