ट्रकची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर जखमी
मालेगांव,
Medshi Bypass Accident नांदेड अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील मेडशी बायपास वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. महामार्ग निर्माण करताना करण्यात आलेल्या चुकीमुळे याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवार, १६ मे रोजी रात्री ८.४५ वाजता मेडशी बायपास वरील सरपंच हॉटेल समोर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जणाचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार १६ मे रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास वाशीम कडून अकोला कडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक एम. एच. ०४ ए. यू. १७६० ने मेडशी बायपास वरील हॉटेल सरपंच समोर मोटरसायकल क्रमांक एम. एच. २८ ए. सी. ४८३७८ ला जोरदार धडक दिली.या अपघातात मालेगांव तालुयातील राजुरा येथील पुरूषोत्तम उर्फ बबन पंजाब राऊत वय ३२ व सत्तारखाँ अलियारखाँ पठाण वय ३५ हे दोघे गंभीर जखमी झाले होते. अपघात होतांच आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना रुग्णवाहीकेने तातडीने अकोल्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे डॉटरांनी सत्तारखाँ अलियारखाँ पठाण याला मृत घोषित केले तर पुरूषोत्तम पंजाब राऊत वर उपचार सुरू आहेत.
Medshi Bypass Accident मेडशी बायपास या ठिकाणी अंडर बायपास देण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. त्यासाठी ३० एप्रिल रोजी रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. मेडशी बायपासवर तातडीची उपाययोजना म्हणून पातूर घाटामध्ये टाकण्यात आलेल्या गतीरोधका प्रमाणे गतिरोधक टाकण्यात आले तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल. प्रशासनाची दिरंगाई नागरिकांसाठी घातक ठरत असून समय सुचकता दाखवत कारवाई केली नाही तर मृत्यूचा तांडव असाच सुरू राहील यात काही शंका नाही, निष्पाप नागरिकांचा जीव घेणारा शासनाचा संबंधित विभाग मात्र अजून किती दिवस कुंभकर्णी झोपेत राहील हे येत्या काळात समजेल.