आ. शाम खोडे यांनी घेतले दत्तक
मंगरुळनाथ,
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तालुयातील एका तरुण धावपटूने क्रीडा क्षेत्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुयातील तांदळी येथील नैतिक गोपाल घुमरे या अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाने विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत MLA Sham Khode आ. शाम खोडे यांनी त्याला पुढील क्रीडा प्रवासासाठी दत्तक घेतले आहे.
नैतिक घुमरे याची घरची परिस्थिती अत्यंत साधी आणि गरिबीची आहे. घरी केवळ एक एकर शेती असून, त्याचे वडील तांदळी - महान या मार्गावर ऑटो चालवतात तर आई धुणे, भांड्याचे काम करते.मात्र, खेळाविषयीची उपजत आवड आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द याच्या जोरावर त्याने मैदानात घाम गाळण्यास सुरुवात केली. कोणत्याही आधुनिक सुविधा नसताना, केवळ नैसर्गिक प्रतिभा आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे त्याने धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. राज्यस्तरावरील अनेक खाजगी व शासकीय स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत मानाची पारितोषिके पटकावली आहेत. नुकत्याच नाशिक येथे ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नैतिक हा इयत्ता ९ वी मध्ये शिकत असून, आता पर्यंत त्याने १२ मेडल्स व अनेक प्रमाणपत्र मिळवले आहे.
MLA Sham Khode नैतिकच्या अंगी असलेली खेळाविषयीची निष्ठा आणि भविष्यातील त्याची चमकण्याची क्षमता ओळखून आ. खोडे यांनी त्याचा २१०० रुपये रोख रक्कम व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.तसेच शिक्षण व क्रीडा प्रशिक्षणासाठी तो धावपटू असेपर्यंत दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच त्यास प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये खुराक देण्याचा निर्णय खोडे यांनी घेतला आहे. यामुळे नैतिकच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले असून, त्याला आता उत्तम दर्जाचे मार्गदर्शन आणि क्रीडा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी नगरसेवक नंदलाल पवार, रमेशसिंह ठाकूर, बाळू दिवेकर आदींची उपस्थिती होती.