वाशीमच्या छाबडा पेट्रोल पंपावर वाहनधारकांमध्ये राडा
वाशीम,
Petrol and Diesel Shortage वाशीम जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलच्या संभाव्य तुटवड्याच्या भीतीने वाहनधारक पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी करत असून, अनेक जण कॅन, ड्रम व विविध भांड्यांमध्ये इंधन साठवण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशीम येथील अकोला नाका स्थित छाबडा पेट्रोल पंपावर नंबर लवण्याच्या कारणावरुन वाहनधारकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले.
शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या तसेच कॅन घेऊन आलेल्या नागरिकांच्या रांगा लागल्याने काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पेट्रोल पंप चालकांची तारांबळ उडाली असून, सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ज्वलनशील पदार्थ असलेल्या पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणात कॅनमध्ये विक्री होत असल्याने अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये अफवा आणि भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत आहे.
Petrol and Diesel Shortage वाशीम शहरातील पेट्रोल पंपावर तीन दिवसापासून वाहनधारकांच्या इंधन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोल - डिझेल नाही, असे फलक लावले आहेत. १६ मे रोजी सायंकाळच्या दरम्यान शहरातील अकोला नाका स्थित पेट्रोल पंपावर पेट्रोल - डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांची एक झुंबड उडाली. नंबर लावण्याच्या कारणावरुन वाहनधारकांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.