मुंबई,
disha-pardeshi : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या गाजत असलेल्या राजा शिवाजी या चित्रपटामध्ये अभिनेत्री दिशा परदेशी हिने अफझलखानाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, अभिनेत्रीने नुकतीच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक भावुक आठवण शेअर केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांना हा सिनेमा पाहता आला नाही, याची खंत दिशाने व्यक्त केली.
एका मुलाखतीत बोलताना दिशा म्हणाली की, तिच्या वडिलांना ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल खूप अभिमान होता. ते सतत नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या लोकांना फोन करून आपल्या मुलीचा चित्रपट पाहण्याचे आवाहन करत होते. चित्रपटात दिशा मोठ्या कलाकारांसोबत झळकत असल्याने ते खूप आनंदी होते. मात्र घरातील पाळीव कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेण्यासाठी त्यांनी चित्रपट पाहण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला होता. त्यांनी “तुम्ही जाऊन या, मी नंतर पाहीन,” असे सांगितले होते.
दिशाने पुढे सांगितले की, चित्रपटाच्या प्रमोशन आणि इतर कामांमध्ये ती व्यस्त होती. त्यामुळे पुढच्या आठवड्यात बाबांना स्वतःसोबत चित्रपट दाखवायचा तिचा विचार होता. पण त्याआधीच त्यांच्या निधनाची दु:खद घटना घडली. त्यामुळे वडिलांना स्वतःचा सिनेमा दाखवता आला नाही, ही खंत तिच्या मनात कायम राहील, असे ती भावुक होत म्हणाली.
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटात संजय दत्त यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल दिशाचे विशेष कौतुक होत आहे.