नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा वाढता असंतोष आता उघडपणे समोर येत असून भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) ने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निकालांतील गोंधळ, पदव्या रखडणे, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत होणारा विलंब तसेच विद्यार्थ्यांना होणारा मानसिक आणि शैक्षणिक त्रास लक्षात घेऊन युवा मोर्चातर्फे विशेष विद्यार्थी समस्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात हा संवाद कार्यक्रम होणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणी थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे.
या चर्चासत्रात विद्यापीठाचे सिनेट सदस्य विष्णू चांगदे यांच्यासह युवा मोर्चाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर मांडले जातील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांतून समोर आलेल्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याचेही समोर आले असून याकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यापीठाशी संबंधित कोणतीही अडचण असलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.