वणीत 20 मे रोजी ‘शून्य सावली’ दिन

    दिनांक :17-May-2026
Total Views |
काही क्षणांसाठी माणसाची सावली होणार अदृश्य

वणी, 
'Zero Shadow' Day वणी शहरात बुधवार, 20 मे रोजी एक कुतूहलजनक खगोलीय घटना अनुभवायला मिळणार असून त्या दिवशी काही काळासाठी माणसाची सावली पूर्णपणे अदृश्य होणार आहे. या घटनेला ‘शून्य सावली दिन’ असे म्हटले जाते, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी दिली. सूर्याचा भासमान मार्ग उत्तरायण व दक्षिणायन असा पृथ्वीच्या 23.5 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षांशांदरम्यान म्हणजेच कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असतो. या पट्ट्यातील भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी अगदी डोक्यावर येतो. त्यावेळी उभ्या वस्तूची सावली काही क्षणांसाठी दिसेनाशी होते. त्यामुळे या घटनेला ‘शून्य सावली दिन’ असे संबोधले जाते.
 
 
Zero Shadow
 
प्रा. चोपने यांच्या माहितीनुसार, सूर्य दररोज सुमारे 0.5 अंशांनी सरकत असल्याने एकाच अक्षवृत्तावर सलग दोन दिवस ही घटना अनुभवता येते. उत्तरायण आणि दक्षिणायन काळात प्रत्येकी एकदा, असे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रात यावर्षी 3 ते 31 मे या कालावधीत विविध ठिकाणी शून्य सावली दिन अनुभवता येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे रोजी, तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी ही घटना दिसणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 19 ते 22 मे दरम्यान विविध तालुक्यांमध्ये शून्य सावली अनुभवता येणार असून वणी शहरात 20 मे रोजी हा दुर्मीळ खगोलीय अनुभव पाहता येईल.
 
 
Zero Shadow' Day  ही घटना पाहण्यासाठी दुपारी 12 ते 12.35 या वेळेत सूर्य निरीक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दोन ते तीन इंच व्यासाचा व एक ते दोन फूट उंचीचा पोकळ प्लॅस्टिक पाईप किंवा कोणतीही सरळ उभी वस्तू उन्हात ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आल्यानंतर त्या वस्तूची सावली काही क्षणांसाठी पूर्णपणे नाहीशी झालेली दिसून येईल. खगोलप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनी या अनोख्या खगोलीय घटनेचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.