लखीमपूर खेरी,
10 killed in accident in UP उत्तर प्रदेशातील मधील लखीमपूर खेरी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पीलीभीत-बस्ती महामार्गावरील अदलीसपूर गावाजवळ भरधाव ट्रक आणि प्रवासी मॅजिक वाहनामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मॅजिक वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.मिळालेल्या माहितीनुसार, मॅजिक वाहन लखीमपूरहून सिसैया दिशेने प्रवाशांना घेऊन जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने थेट मॅजिक वाहनाला धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की मॅजिक वाहन रस्त्यावर फरफटत जाऊन बाजूला जाऊन थांबले.

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. वाहनातील अनेक प्रवासी गंभीररीत्या अडकून पडले होते. काही प्रवासी धडकेमुळे वाहनाबाहेर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात भरधाव वेग आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न हे अपघातामागील कारण असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाला जखमींवर तातडीने उपचार करण्याचे तसेच मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.