पुएब्ला,
10 killed in shooting in Mexico मेक्सिकोच्या पुएब्ला राज्यात घडलेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तेहुइत्झिंगो नगरपालिका परिसरात अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी अचानक नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याने किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने दिली आहे. एका वृत्तानुसार, ही घटना रविवारी घडली असून हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि अनेकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर नियंत्रणात घेतला आहे.
राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले असून आरोपींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. “शून्य दंडमुक्ती” धोरणाअंतर्गत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र स्थानिक आणि संघीय तपास यंत्रणांनी संयुक्त तपास मोहीम सुरू केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून मेक्सिकोमध्ये वाढत चाललेल्या टोळी हिंसाचार आणि संघटित गुन्हेगारीमुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.