कारंजा लाड,
car window smashed शहरातील बायपासवरील झाशी राणी चौकामध्ये भरदिवसा कारची काच फोडून २० लाख रुपयांची रोकड चोरांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना आज, १८ मे रोजी सकाळी ११.३० वाजतादरम्यान घडली. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा येथील प्रतिष्ठित व्यापारी चेतन अरुण हेडा यांनी स्थानिक अॅक्सिस बँकेतून २० लाख रुपयांची रोकड काढली होती. ही रक्कम एमएच ३७ जी ८६४५ क्रमांकाच्या कारमधून घेऊन जात असताना ते बायपासवरील झाशी राणी चौकाजवळील राधाकृष्ण हॉटेलसमोर थांबले. आंबे खरेदी करण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या एका बाजूस कार उभी करून दुसर्या बाजूस गेले असता, चोराने संधी साधत चालकाच्या सीटजवळील खिडकीची काच फोडली आणि रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाला. विशेष म्हणजे, ही घटना अतिशय गजबजलेल्या परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.car window smashed पोनि दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उमेशकुमार बिबेकर, मोहम्मद परसुवाले व अन्य पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली आहे. या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरांचा माग काढून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.