तभा वृत्तसेवा
राळेगाव,
cattle-rescued : गोवंश घेऊन येत असलेल्या आयशर वाहनाचा वडकी व राळेगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग करून 25 गोवंशांची सुटका करण्यात आली. यावेळी वाहनातील आरोपी पळून गेले. या कारवाईत गोवंशासह एक कंटेनर असा एकूण 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार, 18 मे रोजी पहाटेच्या सुमारास वडकी व राळेगाव पोलिसांनी रिधोरा गावाजवळ केली.
गोवंश भरून असलेला ट्रक राळेगावकडून वडकीकडे येत असल्याची माहिती राळेगाव पोलिसांनी वडकी पोलिसांना दिली. आयशर ट्रक गोवंश घेऊन भरधाव जात आहे, या माहितीवरून वडकी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी पथकासह तातडीने उमरेड टोल नाका गाठले.
मात्र या ट्रक चालकाने रिधोरामार्गे ट्रक पळविला. ट्रकचा वेग आणि परिस्थिती पाहता पोलिसांनी रिधोरा व विहीरगाव रस्ता जाम केला. पहाटे 4 च्या सुमारास संशयास्पद ट्रक घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी त्याला वेढा घातला. यावेळी आयशर चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.
यावेळी पंचासमक्ष आयशर ट्रकची तपासणी केली असता त्यात 25 गोवंश बैलांपैकी 5 मृत बैल अत्यंत निर्दयपणे कोंडलेले आढळले. पोलिसांनी 4 लाख रुपये किंमतीचे गोवंश आणि 20 लाख रुपयांचा आयशर ट्रक असा एकूण 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात आणि सहायक पोलिस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात वडकी व राळेगाव पोलिसांनी केली. या कारवाईमुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहे.