भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची आली अधिकृत झलक

    दिनांक :18-May-2026
Total Views |

नवी दिल्ली,
A Glimpse of India's First Bullet Train देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची अधिकृत झलक समोर आली असून नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात तिचे डिझाइन आणि फोटो सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करण्यात आले आहेत. या ऐतिहासिक क्षणामुळे भारतात हाय-स्पीड रेल्वेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावणारी ही ट्रेन देशातील प्रवासाचा वेग आणि स्वरूप पूर्णपणे बदलणार असल्याचे मानले जात आहे.
 

train 
 
रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक ४ वर लावण्यात आलेला बुलेट ट्रेनचा फोटो पाहण्यासाठी नागरिक आणि प्रवाशांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे. आधुनिक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही ट्रेन भारताला जगातील मोजक्या हाय-स्पीड रेल्वे देशांच्या यादीत स्थान मिळवून देणार आहे.सुमारे ५०८ किलोमीटर लांबीचा मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमधून जाणार असून मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ स्थानके या मार्गावर विकसित केली जात आहेत.
 
 
या प्रकल्पातील बांधकामालाही वेग आला असून गुजरातमधील बहुतेक स्थानकांवर पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात ठाणे, विरार आणि बोईसर येथे काम वेगाने सुरू आहे, तर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील स्थानकासाठीचे उत्खनन जवळपास पूर्ण झाले आहे. समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचे कामही सध्या प्रगत टप्प्यात आहे.ही बुलेट ट्रेन ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत विकसित केली जात असून चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी आणि बंगळूरमधील बीईएमएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तिची निर्मिती केली जात आहे. अंदाजे २८० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ही ट्रेन मुंबई ते अहमदाबादमधील प्रवास काही तासांमध्ये पूर्ण करेल.