मुंबई,
murshidabad bomb blast case मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर विभागाने (सीआययू) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आश्रम परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी बोरिवली रेल्वे स्थानकावरून पकडण्यात आले असून, त्यांना पुढील कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर घडली होती. या प्रकरणी बहारामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी मुंबईत पळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई करत त्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख २४ वर्षीय रॉकी खान आणि २५ वर्षीय शहादत सरकार अशी पटली आहे. रॉकी खान कांडी हॉटेल पाडा येथील रहिवासी असून चालक म्हणून काम करतो, तर शहादत सरकार नतुन पुरा गावातील असून मजुरीचे काम करतो. अटकेनंतर दोघांनाही न्यायालयात हजर करून दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना पुढील चौकशीसाठी बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
या प्रकरणात स्थानिक तक्रारदार पशुपतिनाथ साहा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीनुसार, अली हुसेन उर्फ लादेन, हसन एसके आणि त्यांच्या इतर साथीदारांनी या घटनेत सहभाग घेतल्याचा आरोप आहे. काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, १२ मे रोजी आरोपींनी आश्रम परिसरातील दुर्गा मंदिरासमोर लावलेल्या फलकाची तोडफोड केली होती.murshidabad bomb blast caseत्यानंतर १३ मे रोजी रात्री सुमारे १०:४५ वाजता आश्रमाजवळील मोकळ्या मैदानात सॉकेट बॉम्ब फेकण्यात आले. पुढील दिवशी, १४ मे रोजी सकाळी आरोपींनी किराणा दुकानात जाऊन धमकी दिली होती की पोलिसांकडे तक्रार केल्यास आणखी बॉम्बहल्ले केले जातील.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी गीतांजली एक्सप्रेसने मुंबईत पळून आले होते. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.