पाच महिन्यांचा प्रतीक्षाकाळ संपला

डॉ. अखिलेश पेशवे यांच्याकडे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाची धुरा

    दिनांक :18-May-2026
Total Views |
नागपूर,
akhilesh-peshwe : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावरील प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे यांची प्र-कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 

Dr.-Akhilesh-Peshve
 
 
डिसेंबर महिन्यात कुलगुरूपदी डॉ. मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाल्यानंतर प्र-कुलगुरू निवडीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, अशी चर्चा होती. मात्र विविध कारणांमुळे ही प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहिली. मार्च महिन्यात या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती; परंतु ती अचानक रद्द झाल्याने नियुक्तीचा प्रश्न आणखी लांबला. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सोमवारी अखेर या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आले.
 
सर्वानुमते डॉ. पेशवे यांच्या नावाला पसंती
 
प्र-कुलगुरूपदाच्या शर्यतीत अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, डॉ. रविशंकर मोर आणि डॉ. योगेश भुते यांची नावेही चर्चेत होती. विद्यापीठ शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातही या निवडीबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र डॉ. अखिलेश पेशवे यांचे नाव समोर येताच व्यवस्थापन परिषदेत सर्वानुमते त्यांना पाठिंबा देण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक अनुभवासह संघटनात्मक कार्याचा विचार करून ही निवड झाल्याचे बोलले जात आहे.
 
शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू आणि संघटनशील व्यक्तिमत्त्व
 
डॉ. अखिलेश पेशवे सध्या धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी आर. एस. मुंडले धरमपेठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर म. पा. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळली आहे. इंग्रजी विषयात त्यांनी विद्यावाचस्पती पदवी संपादन केली असून शैक्षणिक, प्रशासकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात त्यांची ठळक ओळख आहे. ते भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.