AIASL व्यवस्थापन झुकले, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

    दिनांक :18-May-2026
Total Views |

मुंबई,
all-india-workers-union : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास आणि दडपशाहीविरोधात आज मुंबई विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
 
 
all-india-workers-union
 
 

या आंदोलनात शेकडो कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विमानतळ परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे वातावरण तापले होते. कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या, कामकाजातील अडचणी आणि व्यवस्थापनाच्या धोरणांविरोधात जोरदार निषेध नोंदवला.
 

आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर अखेर AIASL व्यवस्थापनाला चर्चेसाठी पुढे यावे लागले. व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी थेट आंदोलनस्थळी दाखल झाले आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
 

या चर्चेत व्यवस्थापनाकडून सहाय्यक महाव्यवस्थापक महेश कांबळे, मानव संसाधन व्यवस्थापक सुनीता भरदोज आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तर कामगार संघटनेकडून महाराष्ट्र सचिव राजेंद्र भिसे आणि अजित आचरेकर यांनी सहभाग घेतला.

 
कामगारांच्या एकजुटीमुळे हे आंदोलन यशस्वी ठरल्याचे संघटनेने सांगितले असून, भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना ठामपणे उभी राहील, असे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.