गोंदिया,
arrest-of-habitual-thieves : शहरातील सिव्हिललाईन परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणार्या सराईत चोरट्यांचा गोंदिया शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अवघ्या चार तासांच्या आत छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रितिक ऊर्फ अमन जगन्नाथ पाटील (२७), बादल संजय संतापे (२७) आणि सुनील दशरथ मेश्राम (४८) सर्व रा. कामठी, जि. नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर जाफर मुजफ्फर शेख (४८) रा. कामठी हा फरार आहे.

सविस्तर असे की, फिर्यादी श्रीमती गीता मुकेश तिवारी (५२) रा. सिव्हिल लाईन या १५ मे रोजी कुटूंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून ४७ हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने व नाणी, चांदीची नाणी, चांदीचा कप, हार, दोन घड्याळे आणि तांब्याचे कडे असा एकूण २ लाख ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून १६ मे रोजी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय तुपे करीत असताना त्यांनी डी. बी. पथक आणि चार्ली पथकाच्या मदतीने रेल्वे स्टेशन परिसरात संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी हे संशयित आरोपी दुर्ग (छत्तीसगड) कडे जाणार्या रेल्वेगाडीने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने त्यांचा पाठलाग सुरू केला. दुर्ग रेल्वे स्टेशनवर पोहोचून आरपीएफच्या मदतीने पोलिसांनी संशयित तिघांनाही ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी १६ मे रोजी फिर्यादीच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही मुद्देमाल जप्त केला आहे. फरार आरोपी जाफर शेख याचा कसून शोध सुरू आहे.