पैशांची पिशवी लंपास करणार्‍यास मध्यप्रदेशातून अटक

    दिनांक :18-May-2026
Total Views |
वर्धा,
bag-containing-cash-stolen : हिंगणघाट ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यप्रदेशातील देवास येथून अटक करून त्याच्याकडून १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय सिंह उर्फ बुद्देश्वर सिंह करवल (४०) रा. राजगड ता. मढीयान जि. मिर्झापूर उत्तरप्रदेश असे अटक केलेल्याचे नाव आहे.
 
 
J
 
 
 
पैसे असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूकडून केला जात असताना तांत्रिक माहिती व सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांनी तपासले. दरम्यान संबंधित गुन्हा संजय सिंह उर्फ बुद्देश्वर सिंह करवल याने केल्याचे व तो जिल्ह्यतून पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची चमू छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे रवाना झाली. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पुढे रेल्वेने देवास येथे गेल्याची माहिती मिळाल्यावर देवास रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हिंगणघाट व सेलू तालुयाच्या हिंगणी येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश नागापुरे, अमरदीप पाटील, पवन पन्नासे, आशिष महेशगौरी, दीपक जंगले, रितेश कुन्हाडकर, मंगेश आदे, शुभम राउत, सुगम चौधरी, अंकित जिभे यांनी केली.