बुरांडा-हटवांजरी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

अपघाताचा धोका प्रचंड वाढला

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
risk-of-accident : मारेगाव तालुक्यातील बुरांडा ते हटवांजरी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वर्ष 2017-18 मध्ये तयार करण्यात आलेला रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची अवस्था पाहता संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
 
 
JLI
 
राज्य महामार्गावरून बुरांडाकडे जातांना पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध तब्बल दीड फुटाचा मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे नॅशनल हायवेवरून येणाèया वाहनचालकांना गावात प्रवेश करताना खड्ड्यांचे दर्शन घेतच पुढे जावे लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, चारचाकी असो किंवा दुचाकी, खड्ड्यातून गेल्याशिवाय गावात प्रवेशच शक्य नसल्याची वास्तव परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
 
बुरांडापासून हटवांजरीपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून गिट्टीचे थर निघून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर पूर्ण गायब झाले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
 
 
 
विशेष म्हणजे, हा रस्ता परिसरातील अनेक गावांना जोडणारा मुख्य मार्ग असल्याने दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
 
 
पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील काळात नागरिकांच्या हालअपेष्टा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.