गोंदिया,
minor-canals : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पूर्व भागातील गुदमा गावात मागील २० वर्षांपासून उन्हाळ्यात सिंचनाच्या पाण्यासाठी वंचित राहिलेल्या दिलासा मिळणार आहे. येथील लघू कालव्याच्या माध्यमातून उन्हाळी सिंचनासाठी शेतकर्यांना पुरेसे पाणी मिळत नसून शेतीवर परिणाम होत असल्याची समस्या लक्षात घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून याठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

गुदमा लघू कालव्यावरील मुख्य बांधाचे बांधकाम पूर्ण होणार असून साधारण ५०० मीटर लांबीच्या या कालव्यामुळे ९० एकर क्षेत्राला सिंचन होणार आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षापासून शेतकर्यांना उन्हाळ्यातही सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून, त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जवळच्या अंभोरा येथे नवीन सुपर पैसेज बांधकामाची सुरुवातही आ. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली असून अंभोरा व परिसरातील शेतकर्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. या महत्त्वपूर्ण कामाच्या प्रारंभामुळे शेतकर्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रसंगी आ. अग्रवाल यांनी अंभोरा गावातील हा जुना दगडी सुपर पैसेज काळाच्या ओघात अत्यंत खराब आणि जीर्ण स्थितीत पोहोचला होता. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती तसेच सिंचन व्यवस्थाही विस्कळीत होत होती. शेतकर्यांकडून नवीन, मजबूत बांधकामाची मागणी सतत होत होती. त्या तक्रारी लक्षात घेऊन आपल्याकडून नवीन सुपर पैसेज बांधकामास सुरुवात करून शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगितले. या दोन्ही कामांच्या शुभारंभामुळे गुदमा, अंभोरा आणि परिसरातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.