गोंदिया,
corruption-in-goregaon : गोरेगाव तालुक्यातील मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेल्या चोपा गावात सद्या तेथील ग्राम पंचायतीत १५ वा वित्त आयोगासह इतर योजनांच्या कामामध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तेथील प्रशासक समितीच्या सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारही दिली आहे. मात्र, कारवाईच्या नावावर केवळ थातूर माथूर चौकशी करून प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले असल्याचा आरोप समिती सदस्यांसह गावकर्यांनी केला आहे.
चोपा येथील प्रशासक समितीच्या सदस्या कल्पना बहेकार यांनी दिलेल्या माहितीनुसार चोपा येथील ग्रामपंचायत अधिकारी एस. सी. रहांगडाले यांनी ११ व १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायततर्फे अनोळखी एजेंसीच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने ५ लाख ७६ हजार रुपयाचे पेमेंट केले असून त्यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक बैठकीत याबाबत त्यांनी अंदाज पत्रक किंवा जेएम पोर्टल बाबत कसलीच माहिती किंवा चर्चा केली नाही. दरम्यान, या विषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून प्रशासक समितीच्या विरोधातच पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली.
सादर निवेदनानुसार ग्राम पंचायत अधिकारी रहांगडाले हे कार्यालयात रूजू झाल्यापासून अनेकदा अनुपस्थित राहत असल्याचे नमूद असून गावातील पदाधिकार्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कामे करीत आहेत. ज्या ठिकाणी रस्ता बांधकामाची गरज नाही तिथे रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असताना गावातील काही रस्त्यांची अवस्था गंभीर आहे. विशेष म्हणजे, गावातील करदात्यांना कर मागणीचे कसलेच नोटीस न देता नमूना ९ च्या यादीचे चौकात वाचन करून आजी माजी पदाधिकार्यांची बदनामी करण्याचे कामही त्यांनी केले आहे. यावर समितीच्या सदस्यांनी ५ एप्रिल रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावर मुकाअ यांनी १० एप्रिल रोजी गटविकास अधिकारी गोरेगाव यांना पत्र देऊन कारवाईचे आदेश दिले. मात्र, पंचायत समितीतर्फे थातूर मातूर चौकशी करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रशासक समितीच्या सदस्यांनी केला आहे.
चौकशी सुरु आहे...
सदर प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून यावर विस्तार अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- हेमराज गौतम, गटविकास अधिकारी, गोरेगाव
चौकशीत जे समोर येईल ते मान्य...
मंगळवारी १९ मे रोजी चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत जे समोर येईल ते मान्य राहणार असून त्यात मी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी.
- एस. सी. रहांगडाले, ग्रामपंचायत अधिकारी, चोपा