महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मुंबई,
Election Announced for Legislative Council Seats महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून भरण्यात येणाऱ्या १६ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ मे पासून सुरू होणार असून १ जून ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. अर्जांची छाननी २ जून रोजी होणार असून त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 Council Seats 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही काळ लांबणीवर गेल्याने विधानपरिषदेच्या या जागाही प्रलंबित होत्या. मात्र अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यामुळे या १६ जागांसाठीचा मार्ग मोकळा झाला असून आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.या निवडणुका सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांमध्ये होणार आहेत.
 
दरम्यान, अलीकडेच विधानपरिषदेच्या विधानसभा सदस्यांच्या मतदानावर आधारित ९ जागांची निवडणूक पार पडली होती. त्यानंतर बिनविरोध निवड झालेल्या तसेच पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा शपथविधी विधान भवनात पार पडला होता. या वेळी राज्यातील प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते आणि नव्या सदस्यांनी शपथ घेतली होती. आता १६ जागांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे मानले जात आहे.