बीजिंग,
Ganges Becoming a Dead Zone जागतिक तापमानवाढ आणि सातत्याने बदलणारे हवामान यामुळे पृथ्वीवरील नद्यांचे अस्तित्वच धोक्यात येत असल्याचा गंभीर इशारा एका नव्या आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आला आहे. वाढत्या तापमानामुळे नद्यांमधील नैसर्गिक ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होत असून, त्यामुळे जलचर जीवसृष्टी आणि संपूर्ण परिसंस्थेवर मोठा परिणाम होत आहे. या संशोधनात भारतातील गंगा नदीचाही समावेश करण्यात आला असून, गंगेतील ऑक्सिजन पातळीत गेल्या काही दशकांत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. जर हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात अनेक नद्या “डेड झोन” मध्ये रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाण्याचे वाढते तापमानही कारणीभूत
चीनमधील संशोधकांनी १९८५ ते २०२६ या काळातील सुमारे २१ हजार नद्यांचा सखोल अभ्यास केला असून, उपग्रह तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मिळालेल्या निष्कर्षांनुसार जगभरातील नद्यांमधील ऑक्सिजन पातळी सरासरी २.१ टक्क्यांनी घटली आहे. हा बदल छोटा वाटला तरी दीर्घकालीन परिणाम अत्यंत गंभीर असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. वाढते जलप्रदूषण, कार्बन उत्सर्जन आणि मानवी हस्तक्षेपामुळे नदीच्या आरोग्यावर मोठा ताण निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाण्याचे वाढते तापमान हे देखील या घटनेमागील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे, कारण उष्ण पाण्यात ऑक्सिजन कमी प्रमाणात मिसळतो.
योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक
महत्वाचे म्हणजे औद्योगिक सांडपाणी, अनियंत्रित प्रदूषण, धरणे आणि नदी प्रवाहात केलेले बदल यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. जिथे पाणी जवळजवळ विषासमान होऊन जलचर जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट होऊ शकते. आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. कार्बन उत्सर्जनात कपात, औद्योगिक प्रदूषणावर कठोर नियंत्रण आणि जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास नद्यांचे अस्तित्व काही प्रमाणात वाचवता येऊ शकते, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.