गोंदियाचे डॉ. जैन यांचा आंतरराष्ट्रीय मंचावर गौरव

- एएसजीबीआय परिषदेत सादर झाली ‘विकास टेक्निक’

    दिनांक :18-May-2026
Total Views |
गोंदिया,
vikas-jain : एएसजीबीआय एन्यूअल सायंटिफीक मिटींग या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय शल्यचिकित्सक गोंदिया येथील डॉ. विकास जैन यांनी विकसित केलेल्या ‘विकास टेक्निक’चे यशस्वी सादरीकरण करत भारताच्या वैद्यकीय क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. ब्राइटन (यूके) येथे आयोजित या परिषदेत प्रथमच या अभिनव तंत्रज्ञानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली.
 
 
K
 
 
 
‘विकास टेक्निक’ ही तिसर्‍या व चौथ्या श्रेणीतील मूळव्याध (बवासीर) उपचारासाठी विकसित करण्यात आलेली अत्याधुनिक लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया पद्धती आहे. ही पद्धत प्रसिद्ध चिवटे टेक्निक वर आधारित असून त्यात आधुनिक सुधारणा करण्यात आली आहे. या तंत्रात डेंटेट लाईनपासून ४ सेंमी आणि २ सेंमी वर दोन स्तरांवर सलग दुहेरी इंटरलॉकिंग टाके पद्धतीचा वापर करण्यात येतो. तज्ज्ञांच्या मते, या तंत्रामुळे मलाशय आणि गुदनलिकेची नैसर्गिक लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर उद्भवणार्‍या गुंतागुंती कमी होण्याची शक्यता असून रुग्णांना अधिक सुरक्षित आणि परिणामकारक उपचार मिळू शकतात. परिषदेत उपस्थित आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ‘विकास मॉडिफिकेशन’चे विशेष कौतुक केले. तसेच या संशोधनाचा सारांश प्रतिष्ठित ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरी च्या आगामी अंकात प्रकाशित होण्यासाठी स्वीकृत करण्यात आला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद उपलब्धी मानली जात आहे. या यशाबद्दल बोलताना डॉ. विकास जैन यांनी आपल्या गुरुजनांचे, सहकार्‍यांचे आणि विशेषतः स्वर्गीय डॉ. चिवटे यांचे आभार मानले. त्यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि मूळ तंत्राच्या आधारावरच ‘विकास टेक्निक’ विकसित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय शल्यचिकित्सा क्षेत्रातील नवकल्पनांना जागतिक स्तरावर मिळालेली ही मोठी मान्यता असून, संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.