जालना,
Illegal Stock of Fertilizer शहरातील नवीन मोंढा परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत अवैध खतसाठ्यावर छापा टाकला आहे. या कारवाईत सुमारे 1,762 खताच्या गोण्या आणि अंदाजे 18 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा संशयित खतसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कृषी विभागाच्या विभागीय आणि जिल्हा भरारी पथकाने नवीन मोंढा येथील एपीएमसी मार्केटमधील एका गाळ्यावर अचानक तपासणी केली. या ठिकाणी ट्रकमधून मोठ्या प्रमाणात खताच्या गोण्या उतरवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तपासात विविध प्रकारची खते आढळून आली असून संपूर्ण साठ्याची किंमत अंदाजे 18 लाख 7 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कारवाईदरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित माल नांदेड येथील एका कंपनीला विक्री झाल्याचे कागदपत्रांमध्ये दाखवले असले तरी प्रत्यक्षात तो जालना येथील ‘जयभारत ॲग्रो ट्रेडर्स’च्या अनधिकृत गोदामात उतरवला जात असल्याचे आढळून आले. यामुळे खत वितरणात गंभीर अनियमितता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात हेही समोर आले की, संबंधित व्यापाऱ्याच्या खत विक्री परवान्यात या गोदामाचा समावेश नव्हता. याबाबत चौकशी करण्यात आली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अधिक संशय निर्माण झाला आहे. तसेच काही खतांचा संबंध यापूर्वी झालेल्या अन्य एका गैरव्यवहार प्रकरणाशी जोडला जात असल्याची माहितीही पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणात अनुदानित खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई निर्माण करणे तसेच अनधिकृत री-पॅकिंगसाठी वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.