ट्रम्प यांच्या 'स्टॉक ट्रेडिंग'वरून चौकशीची मागणी

    दिनांक :18-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Inquiry into Trump's Stock Trading अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत ट्रम्प किंवा त्यांच्या सल्लागारांकडून हजारो शेअर व्यवहार झाल्याचा खुलासा समोर आल्यानंतर अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्यवहारांमुळे हितसंबंधांच्या संघर्षाबाबत नवे प्रश्न निर्माण झाले असून वॉल स्ट्रीटमधील तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.एका अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत ट्रम्प यांच्याशी संबंधित तब्बल 3,700 हून अधिक स्टॉक व्यवहार झाले. म्हणजेच दररोज सरासरी 40 पेक्षा जास्त व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत हा आकडा प्रचंड वाढलेला असल्याचे सांगितले जात आहे.
 
 

Stock Trading
 
या व्यवहारांमध्ये अमेरिकेतील अनेक मोठ्या तंत्रज्ञान, वित्तीय, सुरक्षा आणि मीडिया कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, मेटा प्लॅटफॉर्म्स, बोईंग आणि ओरॅकल कॉर्पोरेशन यांसारख्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही व्यवहारांमध्ये लाखो ते कोट्यवधी डॉलर किमतीचे शेअर्स विकले किंवा खरेदी करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ॲमेझॉनमधील मोठ्या हिस्सेदारीची विक्री झाल्याचेही समोर आले आहे. तसेच मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्येही गुंतवणूक करण्यात आली होती.
 
 
या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा नैतिकता आणि राजकीय पारदर्शकतेवर चर्चा सुरू झाली आहे. कारण ज्या कंपन्यांमध्ये व्यवहार झाले, त्या अनेक कंपन्यांवर अमेरिकन सरकारच्या धोरणांचा थेट परिणाम होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, निर्यात धोरण, तंत्रज्ञान नियंत्रण आणि मक्तेदारीविरोधी चौकशा अशा संवेदनशील विषयांशी संबंधित क्षेत्रांमध्ये या कंपन्या कार्यरत आहेत.