ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक के. राजन यांची आत्महत्या

    दिनांक :18-May-2026
Total Views |
चेन्नई
K Rajan तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते के. राजन यांच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेन्नईतील अड्यार परिसरातील कूवम नदीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

K Rajan 
मिळालेल्या माहितीनुसार, के. राजन हे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबीयांपासून दूर आणि एकांतात राहत होते. घटनेच्या दिवशी ते वॉशरमॅनपेट परिसरातून आपल्या खासगी मोटारीने बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत वाहनचालकही उपस्थित होता. अड्यार नदीवरील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी चालकाला मोटार थांबवण्यास सांगितले. “मी थोडा फेरफटका मारून येतो,” असे सांगून ते खाली उतरले. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी पुलावरून थेट नदीत उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
 
ही घटना पाहताच K Rajan  वाहनचालकाने मदतीसाठी आरडाओरडा केला. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, वाहनचालकाचा जबाब नोंदवण्यात येत आहे. राजन यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, ते मानसिक तणावाखाली होते का, यासह विविध अंगांनी चौकशी सुरू आहे.तमिळ चित्रपटसृष्टीत के. राजन हे प्रभावी आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारिगल’ या चित्रपटाच्या निर्मितीद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. अभिनय क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. तमिळ चित्रपट निर्माते परिषदेतील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे चित्रपटविश्वात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
 
 
चित्रपटसृष्टीतील अंतर्गत K Rajan  वाद, आर्थिक प्रश्न आणि निर्मात्यांच्या अडचणी यांवर ते नेहमीच स्पष्ट भूमिका मांडत असत. मोठ्या कलाकारांच्या वाढत्या मानधनामुळे आणि भव्य खर्चाच्या चित्रपटांमुळे निर्माते आर्थिक संकटात सापडतात, अशी टीका त्यांनी अनेकदा केली होती. काही चित्रपटांच्या वाढलेल्या खर्चामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचा उल्लेख करत त्यांनी उद्योगातील आर्थिक वास्तवावर भाष्य केले होते.याशिवाय, मोठे कलाकार कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात; मात्र चित्रपटांच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत, अशी नाराजीही त्यांनी विविध व्यासपीठांवरून व्यक्त केली होती. त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी राहिले; मात्र तरीही चित्रपटविश्वातील अनेक जण त्यांना निर्भीड आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून मान देत होते.के. राजन यांच्या निधनानंतर तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने तमिळ मनोरंजन विश्वातील एक स्पष्टवक्ते आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.