उष्णतेच्या लाटेने कारंजा तालुका होरपळला

तापमानाचा पारा ४२ अंशांवर शेतीमशागतीची कामे ठप्प

    दिनांक :18-May-2026
Total Views |
कारंजा लाड,
heatwave : मे महिन्याच्या अखेरीस कारंजा तालुक्यात उष्णतेची तीव्रता कमालीची वाढली असून, तापमानाचा पारा तब्बल ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
 
 
KL
 
 
 
सकाळी ९ वाजताच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडत असून, ग्रामीण भागातही उष्णतेचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे शेतीमशागतीची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर असून शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वातावरणात सतत उष्णता वाढत आहे. सकाळपासूनच अंगाची लाही लाही करणारे ऊन पडत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारी १२ ते ५ या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, बाजारपेठांमध्येही ग्राहकांची संख्या घटली आहे. विशेषतः दुचाकीस्वार, फेरीवाले, मजूर वर्ग आणि उन्हात काम करणार्‍या कामगारांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे.
 
 
सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे ग्रामीण भागात सुरू आहेत. शेतकरी मशागत, नांगरणी, शेत साफसफाई, बांध दुरुस्ती आदी कामांमध्ये व्यस्त असतात. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शेतात काम करणे अशक्य झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकरी पहाटे किंवा सायंकाळच्या वेळेत काम करण्यास प्राधान्य देत आहेत. शेतमजुरांचीही मोठी अडचण होत असून, उन्हामुळे थकवा, चक्कर, डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. जनावरांनादेखील उष्णतेचा त्रास जाणवत असून, गुरांना पाणी आणि सावलीची कमतरता भासत आहे. काही भागांत विहिरींची पाणी पातळी घटल्याने पाणीटंचाईची चिन्हेही दिसू लागली आहेत.
उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. दुपारच्या वेळेत अनेक दुकानदारही ग्राहकांच्या अभावामुळे निवांत बसलेले दिसून येत आहेत.
 
 
 
दुसरीकडे, थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी, ताक, आईस्क्रीम व फळांच्या रसांच्या दुकानांवर मात्र, नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून नागरिक थंड पदार्थांकडे वळले आहेत. दरम्यान प्रशासनाने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, उन्हात काम करणार्‍यांनी वेळोवेळी विश्रांती घ्यावी तसेच पुरेसे पाणी पिण्यावर भर द्यावा, असे सांगण्यात आले आहे. आगामी काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, उष्णतेच्या या लाटेमुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले आहे. त्यामुळे नागरिक आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तापमान वाढल्यामुळे कुलर, पंखे, एसी आणि मोटारपंप यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी वीजेची मागणी वाढून काही ग्रामीण भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
 
आरोग्यावर परिणाम
 
 
वाढत्या उन्हामुळे उष्माघात, डिहायड्रेशन, अंगात अशक्तपणा, ताप, डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दुपारच्या वेळेत विनाकारण बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका व पौष्टिक आहार घ्यावा तसेच डोक्यावर टोपी, गमछा किंवा कापड वापरावे. उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे टाळावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.