जम्मू,
Kashmir's Youth Succumb to Drugs जम्मू आणि काश्मीरमध्येअंमली पदार्थांचे वाढते जाळे आता गंभीर सामाजिक आणि सुरक्षा संकट बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात युवक ड्रग्जच्या आहारी जात असल्याची माहिती समोर आली असून सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल 13 लाखांहून अधिक लोक विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. काही वर्षांपूर्वी हा आकडा सुमारे 6 लाखांच्या आसपास होता. अल्पावधीत व्यसनाधीनांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याने प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि समाजामध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादासोबतच ड्रग्जचे नेटवर्कही वेगाने वाढत आहे. सीमावर्ती भागातून पाकिस्तानमार्गे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या वाढत्या तस्करीमुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून राज्याच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनीही या परिस्थितीबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी ड्रग्ज नेटवर्क आणि पाकिस्तान समर्थित दहशतवाद यांच्यातील संबंधांकडे लक्ष वेधत हे संकट जम्मू-काश्मीरसमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक बनत असल्याचे म्हटले आहे.
विशेष नशामुक्ती मोहीम सुरू
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राज्यभर विशेष नशामुक्ती मोहीम सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालये, धार्मिक संस्था आणि स्थानिक समुदायांच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती केली जात असून लाखो लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.या संकटाची भीषणता अनेक कुटुंबांच्या अनुभवातून समोर येत आहे. दक्षिण काश्मीरमधील एका कुटुंबाने सांगितलेल्या माहितीनुसार, मित्रांच्या दबावामुळे एका विद्यार्थ्याने सुरुवातीला धूम्रपान सुरू केले आणि नंतर तो हळूहळू गंभीर अमली पदार्थांच्या आहारी गेला. व्यसन इतके वाढले की कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले.
पंजाबमधील ड्रग्ज नेटवर्कशी संबंध
दरम्यान, ड्रग्जच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या काही युवकांनीही या नेटवर्कची गंभीरता स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, सीमावर्ती भागातून अमली पदार्थ राज्यात पोहोचवले जातात आणि त्यानंतर स्थानिक टोळ्यांच्या माध्यमातून युवकांना लक्ष्य केले जाते. काही टोळ्यांचे संबंध पंजाबमधील मोठ्या ड्रग्ज नेटवर्कशी असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणात प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली असून NDPS कायद्यांतर्गत शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील संवेदनशील भागांची ओळख पटवून तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि गुप्त पाळत ठेवली जात आहे. अनेक ड्रग्ज विक्रेते आणि व्यसनाधीनांना अटक करण्यात आली असून आर्थिक व्यवहार आणि सीमापार संपर्कांचाही तपास सुरू आहे.