लातूर,
Latur's connection to the NEET case नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात देशभर खळबळ उडवणारी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण तपासासाठी सीबीआयचे सुमारे 28 अधिकाऱ्यांचे विशेष पथक लातूरमध्ये दाखल झाले होते. या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची सुमारे 8 ते 10 तास सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि काही बाबी संशयास्पद आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणाबाबत सीबीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या तपासाचा धागा पुण्यातील एका आधीच्या अटकेशी जोडला जात असल्याचेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीतूनच लातूरमधील हे नाव समोर आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर सीबीआयने लातूरमध्ये तपासाची दिशा अधिक तीव्र केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता नांदेडपर्यंत पोहोचल्याचेही समोर आले आहे. सीबीआयच्या विशेष पथकाने नांदेडमधील विद्युतनगर परिसरात छापा टाकत एका संशयित कुटुंबाची तब्बल 7 ते 8 तास कसून चौकशी केल्याची माहिती आहे. या कुटुंबावर आपल्या मुलीसाठी लाखो रुपयांत नीट पेपर खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही कारवायांमुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सीबीआयकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.