पुणे
MSRT सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती, दुर्बल घटकांसाठी योगदान देणारे कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले खेळाडू, पत्रकार आणि शासकीय पुरस्कार विजेते यांना महाराष्ट्र शासनाकडून एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी १०० टक्के मोफत वार्षिक पास देण्याची योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. या योजनेमुळे राज्यातील मान्यवर व्यक्तींना संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवासाची सुविधा मिळत असून, पुणे विभागातून चालू आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) एकूण २०१ लाभार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे एसटी विभागामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागातील विविध शासकीय पुरस्कार विजेत्यांना विशेष बाब म्हणून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये प्रवासाची पूर्ण सवलत देण्यात येते. साध्या, निमआराम तसेच शिवनेरी आणि शिवाई यांसारख्या सेवांमधूनही हे लाभार्थी वर्षभर मोफत प्रवास करू शकतात. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत पुरस्कार विजेत्यासोबत एका सहप्रवाशालाही मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.राज्य शासनाकडून विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कार विजेत्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने ही मोफत प्रवास योजना राबवली जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित एसटी आगारात अर्ज करणे आवश्यक असून, पुरस्कार प्रमाणपत्र, शासकीय आदेश किंवा राजपत्र, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो ही कागदपत्रे सादर करावी लागतात. हा पास दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.
या योजनेअंतर्गत MSRT विविध श्रेणीतील पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. आदिवासी सेवक पुरस्कार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, अर्जुन, द्रोणाचार्य, शिवछत्रपती आणि दादाजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त खेळाडू, दिव्यांग गुणवंत कामगार पुरस्कार विजेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक पुरस्कार, पत्रकार तसेच महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार आणि बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. एकूण लाभार्थ्यांमध्ये पत्रकारांची संख्या सर्वाधिक असून ६७ पत्रकारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे पुरस्कार विजेत्यांना प्रवासात मोठी सवलत मिळत असून, त्यांचे सामाजिक व व्यावसायिक कार्य अधिक सुलभ होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याची आणि जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे मतही काही स्तरांतून व्यक्त होत आहे.एकूणच, महाराष्ट्र शासनाची ही मोफत प्रवास योजना सामाजिक सन्मान आणि सुविधा यांचा समन्वय साधणारी ठरत असून, पुणे विभागातील आकडेवारीतून तिचा व्यापक लाभ दिसून येत आहे.