नवी दिल्ली,
Monsoon delayed in India due to Pakistan देशभरात वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मान्सूनबाबतची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर अंदमान-निकोबार बेटांमध्ये प्रवेश केला असला, तरी त्याच्या पुढील वाटचालीत आता अडथळे निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि पश्चिम इराण भागातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मोसमी वारे १६ मे रोजीच अंदमानात दाखल झाले. सामान्यतः २२ मेदरम्यान मान्सून अंदमानात पोहोचतो. त्यामुळे यावर्षी मान्सून लवकर सक्रिय झाल्याने केरळातही तो वेळेआधी दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीला २६ मेपर्यंत केरळात मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हवामानातील बदलांमुळे ही शक्यता कमी होताना दिसत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, अरबी समुद्रात सध्या चक्राकार वाऱ्यांची एक प्रणाली सक्रिय झाली आहे. या प्रणालीमुळे मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला असून मान्सूनची पुढील वाटचाल थांबल्यासारखी दिसत आहे. त्यातच पाकिस्तान आणि पश्चिम इराण भागातून येणारे कोरडे वारे उत्तर भारताच्या दिशेने सरकत असल्याने वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. या वाऱ्यांचा प्रभाव उत्तर प्रदेश, बिहार आणि काही उत्तर भारतीय राज्यांमध्येही दिसून येत असून काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात १० जूनपर्यंत बरसणार
मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याची प्रगती फारशी झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्यांची स्थिती जवळपास स्थिर असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील परिस्थिती पुढील दोन-तीन दिवसांत कशी बदलते, यावर मान्सूनच्या पुढील प्रवासाचे चित्र अवलंबून असणार आहे.दरवर्षी १ जूनच्या आसपास केरळात दाखल होणारा मान्सून त्यानंतर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राकडे सरकतो. साधारण १० जूनपर्यंत मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा मान्सूनचा वेग मंदावल्याने महाराष्ट्रातील पावसाचा मुहूर्तही काही दिवस लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांचे लक्ष आता मान्सूनकडे लागले असून पाकिस्तानकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे भारतीय हवामानावर नेमका किती परिणाम होतो, याकडे हवामान तज्ज्ञांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.