भीषण अपघातांची मालिका...12 मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मुंबई
Palghar highway accident राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडलेल्या भीषण रस्ते अपघातांच्या घटनांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय हिंगोली आणि बीड जिल्ह्यातही दोन वेगवेगळ्या अपघातांत एकूण एक जण ठार झाल्याची नोंद झाली आहे. या सर्व घटनांमुळे राज्यभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
 

 Palghar highway accident, 
पालघर जिल्ह्यातील धानीवली परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात घडला. वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि समोरून येणाऱ्या कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. या ट्रकमध्ये 100 पेक्षा अधिक वऱ्हाडी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी घटनास्थळीच गंभीर जखमी झाले. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
 
 
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील Palghar highway accident  वसमत तालुक्यातील फाटा गावाच्या शिवारात कालव्यामध्ये ट्रॅक्टर कोसळून झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर कदम असे मृत तरुणाचे नाव असून तो ट्रॉलीसह ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट कालव्यात कोसळले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
 
 
तसेच बीड जिल्ह्यातील Palghar highway accident  नागापूर-टोकवाडी मार्गावर झालेल्या आणखी एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संतोष गणपत गुट्टे (वय 44) असे मृताचे नाव असून ते आरोग्य विभागात कार्यरत होते. नागापूर येथे काम आटोपून ते घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.या मार्गावर बेकायदेशीर वीटभट्ट्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने तसेच ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.राज्यातील या सलग अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित विभागांनी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.