विसापूर,
visapur-murder-case : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे युवकाच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एका विधी संघर्ष मुलाने विराज विसापूर येथे असल्याची माहिती घटना घडण्यापूर्वी दिल्याची चर्चा आहे.

विसापूर येथे 15 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता विराज राजेश आगधारी (17, रा. बल्लारपूर) याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी मोनू ऊर्फ रौनक सुखपाल निषाद (19), आकाश रामकरण निषाद (21), जिशान शरीफ सिद्दीकी (19), समीर कलीम खान (21) व एका विधी संघर्ष बालकासह पाच आरोपींना (सर्व रा. बल्लारपूर) यांना अटक करून, पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आरोपींना विसापूर येथील एका विधी संघर्ष मुलाने विराज विसापूर येथे असल्याची माहिती घटना घडण्यापूर्वी दिल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा भ्रमणध्वनी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याद्वारे पोलिस तांत्रिकदृष्टीने तपास करीत आहे. या गुन्ह्यात सहभागी तरुणांच्या वयाचा विचार केला असता, खेळण्या-बागळण्याच्या वयात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली होत आहे. या घटनेचा सखोल तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.