रिसोड,
pre-monsoon-preparations : वीज वितरण कंपनीव्दारे शहर व ग्रामीण भागात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांजवळील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विविध भागांची पाहणी करून वीजवाहिन्यांच्या संपर्कात आलेल्या फांद्या हटवित आहेत. अनेक ठिकाणी झाडांच्या वाढलेल्या फांद्या वीजतारांवर झुकल्याने शॉर्टसर्किट, तार तुटणे तसेच ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होण्याचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः शहरातील पोलिस स्टेशन परिसर तसेच प्रतीक्षा जेन्ट्स पार्लर समोरील भागात मोठ्या प्रमाणात फांद्या वाढल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी तातडीने कारवाई करून धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात आली. महावितरणच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.