सडक अर्जुनीत अतिक्रमणाने रस्ता केला ‘गिळंकृत’

- शेंडा रोडवरील दुर्गा चौकात वाहतूक कोंडी: नागरिकांचा संताप

    दिनांक :18-May-2026
Total Views |
सडक अर्जुनी, 
sadak-arjuni-encroachment : येथील मुख्य बाजारपेठ परिसरातील शेंडा गावाकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील दुर्गा चौक परिसरात रस्ता अरुंद झाला असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठ परिसरात दोन्ही बाजूंनी वाढलेल्या अतिक्रमणामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
sadak-arjuni-encroachment
 
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य चौक असलेल्या दुर्गा चौकातून शेंडा गावाकडे मार्ग जात असून या मार्गावरच तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, पशु चिकित्सालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, नगरपंचायत कार्यालय, पंचायत समिती तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांचे निवासस्थान व कार्यालय असल्याने या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. दरदिवशी शेकडो वाहनांची ये-जा राहत असल्याने शहरातील व्यस्त मार्ग आहे. विशेष म्हणजे, वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेऊन या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले असून रस्ता दुभाजकाचे कामही सुरू करण्यात आले. मात्र अतिक्रमणामुळे काही ठिकाणी दुभाजकाचे काम रखडल्याचे दिसून येत आहे. परिणामी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरील अतिक्रमणात नगरपंचायतीच्या एका पदाधिकार्‍याच्या नातलगाचा ही समावेश असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे प्रशासन अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे व रस्ता रुंद करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांनी केली आहे.