तभा वृत्तसेवा
मारेगाव,
series-of-accidents : मार्डी-खैरी डांबरीकरण रस्त्यावर बेंबळा प्रकल्पांतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे आता वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास मार्डीजवळील अशाच एका खड्ड्यामुळे मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात चोपण येथील प्रणय जगन मसाळकर (वय 21) हा युवक गंभीर जखमी झाला.
प्रणय हा मोटरसायकलने गावाकडे परत येत असताना रस्त्यावरील खड्ड्यात वाहन अडकल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो अद्याप कोमात असल्याचे समजते.
बेंबळा प्रकल्पाचा लाभ मारेगाव तालुक्यातील कुंभा, मार्डी परिसरातील अनेक गावांतील शेतकèयांना होणार असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून कालव्याचे काम संथगतीने सुरू आहे. नुकतेच खैरी-मार्डी राज्य मार्गावर रस्ता खोदून पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात आले नाही. परिणामी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून छोटेमोठे अपघात नित्याचे झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित बेंबळा प्रकल्प विभागाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.