मुंबई,
ST bus tickets expensive राज्यात वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, आगामी काळात एसटी बसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाला दररोज मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते आणि अलीकडेच इंधन दरात वाढ झाल्याने महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिझेलच्या वाढलेल्या किंमतीमुळे दररोज लाखो रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असून वर्षभरात हा आर्थिक ताण कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि भू-राजकीय तणावाचा परिणाम इंधन दरांवर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास इंधन दरात आणखी वाढ होऊ शकते, त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून काही विशेष सवलत मिळाल्यासच ST तिकीट दरवाढ टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.सरकारकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. जर इंधन कंपन्यांकडून जुन्या दराने डिझेल उपलब्ध झाले किंवा सरकारने आर्थिक मदत केली, तर भाडेवाढ टाळली जाऊ शकते. मात्र तसे न झाल्यास ST तिकीट दर वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरनाईक यांनी राज्यातील अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांबाबतही कठोर भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने सायबर पोलिसांना यासंदर्भात पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही गंभीर बाबी समोर आल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ऑनलाइन सेवा देणाऱ्या काही कंपन्यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली असून, केवळ अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवरच कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.