लोकसहभागातून उभारला साठवणूक बंधारा

- अवघ्या सात दिवसांत बांधकाम पूर्ण

    दिनांक :18-May-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
storage-weir : तालुक्यातील रामघाट-निलज येथे लोकसहभाग, सामाजिक बांधिलकी आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याच्या बळावर अवघ्या सात दिवसात साठवणूक बंधार्‍याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील शेती, गुराढोरांसह वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
 
 
MK
 
एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) माध्यमातून तसेच माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सुमारे २५ फूट लांब व ५ फूट उंच असा हा साठवणूक बंधारा उभारण्यात आला. विशेष म्हणजे, या बंधार्‍यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थ आणि शेतकरी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेशीम कापगते यांनी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या घेऊन लघु पाटबंधारे विभाग आणि कृषी विभाग, अर्जुनी-मोरगाव यांच्याकडे अनेकदा अर्ज सादर केले. या बंधार्‍यामुळे शेतीला मोठा फायदा होणार असल्याचे वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, संबंधित विभागांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिकांच्या मते, केवळ ४० ते ५० हजार रुपयांत पूर्ण होणार्‍या या कामाकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले. शासनाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली असती, तर याच कामासाठी लाखो रुपयांचा खर्च दाखविला गेला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कृषी विभागातील तत्कालीन अधिकारी कुंभरे यांनी या बंधार्‍याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली. मात्र त्यांच्या बदलीनंतर हा प्रस्ताव रखडला. शेवटी ग्रामहित डोळ्यासमोर ठेवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेशीम कापगते यांनी स्वखर्चातून हा बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकारातून आणि गावकर्‍यांच्या सहकार्याने हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या बंधारा बांधकामासाठी महेश भोयर, नैतिक कावडे, घनश्याम कावडे, भोयर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी श्रमदान व सहकार्य केले.
...