रुगय्यापल्ली,
Tendu Leaf Harvesting Gains Momentum सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत परिसरात सध्या तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम उत्साहात सुरू असून जंगल परिसर पहाटेपासूनच ग्रामस्थांच्या वर्दळीने गजबजून जात आहे. हातात पोती, डोक्यावर तेंदूपत्त्यांचे गठ्ठे आणि संकलन केंद्रांवर पानांच्या रांगाच रांगा असे चित्र सध्या परिसरात पाहायला मिळत आहे. या हंगामामुळे गावातील अनेक कुटुंबांच्या हाताला काम मिळाले असून ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.जाफराबाद परिसरात तेंदूपत्ता तोडणीला वेग आला असला तरी सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप तेंदूपत्ता तोडणीबाबत अपेक्षित हालचाली दिसून येत आहे. काही गावांत प्रक्रिया सुरू झाली असली तरी तालुक्यातील अनेक खेड्यांतील ग्रामस्थ अजूनही काम सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आदिवासीबहुल भाग असलेल्या सिरोंचा तालुक्यात तेंदूपत्ता हंगाम हा अनेक कुटुंबांच्या रोजगाराचा महत्त्वाचा स्रोत मानला जात असल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत काही भागांत तेंदूपत्ता हंगामाबाबत विविध चर्चा झाल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा तेंदूपत्ता तोडणीचा लाभ ग्रामीण मजुरांना मिळावा आणि उर्वरित गावांमध्येही लवकरात लवकर प्रक्रिया सुरू व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.पहाटेच्या थंड वातावरणात महिला, पुरुष तसेच युवक-युवती जंगल परिसरात जाऊन तेंदूपत्ता गोळा करत आहेत. दिवसभर मेहनत घेऊन संकलित केलेल्या पानांची बांधणी करून ती संकलन केंद्रावर जमा केली जात आहे. मजुरांच्या मेहनतीमुळे केंद्रांवर तेंदूपत्त्यांचे ढीग साचत असून परिसरात सर्वत्र कामाची लगबग दिसून येत आहे.शेतमजुरीची कामे मर्यादित असलेल्या या काळात तेंदूपत्ता हंगाम ग्रामीण कुटुंबांसाठी महत्त्वाचा आधार मानला जातो. त्यामुळे गावातील अनेक नागरिक या हंगामाकडे रोजगाराच्या दृष्टीने पाहत आहेत. महिलांचाही या कामात मोठा सहभाग दिसून येत असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेत आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी तेंदूपत्ता हंगाम हा केवळ रोजगाराचा स्रोत नसून जगण्याला आधार देणारा महत्त्वाचा हंगाम ठरत आहे. त्यामुळे उर्वरित गावांमध्येही लवकरात लवकर तेंदूपत्ता तोडणी सुरू व्हावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून पुढे येत आहे.