तीन चिमुकल्यांचा धरणात बुडून मृत्यू

एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण

    दिनांक :18-May-2026
Total Views |
वरूड,
young-children-drown-in-a-dam : सातनूर शेत शिवारातील शेतातील एकाच कुटुंबातील तीन मुले रविवार, १७ मे रोजी सकाळपासून बेपत्ता होते. त्या तिन्ही बहीण-भावांचे प्रेत सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शेंदूरजनाघाट येथून जवळच असलेल्या पुसली धरणात आढळून आले. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली. पंकज संतुलाल उईके (१०), प्रिया संतुलाल उईके (८), पवन संतुलाल उईके (७) अशी मृतक बालकांची नावे आहेत. पोहणे नसताना पाण्यात पोहण्यासाठी गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
 
 
HJOIK
 
 
प्राप्त माहितीनुसार, संतुलाल उईके रा. घाणाबिंद्रा, ता. नवेगाव, जि. छिंदवाडा (म.प्र) यांचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून सातनूर शेत शिवारातील शेंदूरजनाघाटचे रहिवासी मनोहर व केशव नामदेव निमकर या शेतकर्‍यांच्या शेतात सोकारी म्हणून काम पाहत आहे. त्यांची तिन्ही मुले नरखेड येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. परंतु, शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मागील एक महिन्यांपासून ते आई-वडिलांजवळच राहात होते. रविवारी सकाळी ६ वाजता ते घरून संत्रा वेचण्यासाठी जात असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडले. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत ते तिघेही बहीणभाऊ घरी परतलेच नाही. त्यांच्या आजोबासह आई वडिलांनी नातेवाईकांकडे त्या तिघांचाही शोध घेतला; परंतु, ते रात्री उशिरापर्यंत कुठेही आढळून आले नाही.
 
 
सोमवारी सकाळपासून परत कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली असता दुपारी पुसली धरणाच्या ओव्हर फ्लोच्या मागच्या बाजुस वडिलांना त्यांच्या मुलीसह दोन्ही मुलांच्या अंगावरील कपडे व संत्रा वेचण्यासाठी नेलेल्या दोन डबक्या किनार्‍यावर आढळून आल्या. त्यांनी परत आसपास शोध सुरू केला, तेव्हा त्यांचा मोठा मुलगा व मुलगी यांचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती शेतमालकासह पोलिस पाटील ज्योती लव्हाळे यांना दिली. घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच शेंदूरजनाघाट व पुसली गावातील नागरिकांसह पोलिस पाटील यांनी घटनास्थळ गाठले. शेंदूरजनाघाट पोलिस घटनास्थळी पोहचताच लहान मुलाचे प्रेत सुद्धा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. ठाणेदार दीपक महाडिक यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक मंगेश शेगोकार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही बालकांचे मृतदेह विच्छेदनाकरिता वरूड ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
 
 
//मुलांवर अंत्यसंस्कार
 
 
उईके कुटुंबातील तिन्ही चिमुकल्यांच्या जलसमाधीनंतर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुटुंबीयांनी जडअंतकरणाने तिन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार केले. शोकाकूल वातावरणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे तिन्ही चिमुकल्यांचा दफनविधी पार पडला. चिमुकल्यांच्या मातेचे अश्रु थांबता थांबत नव्हते. कुटुंबीयांच्या देखील डोळे पाणावले होते.
 
 
पुसली धरणात सर्वाधिक मृत्यू
 
 
शे.घाट पोलिस स्टेशन हद्दीतील पुसली धरणाच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग येत असल्याने या धरणाच्या निर्मिती पासून या धरणाने आजपावेतो अनेकांना सामावून घेत जलसमाधी दिली आहे. मच्छीमारांना सुद्धा या धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज लावता आला नाही. कारण काही वर्षांपूर्वी मच्छीमारांचा सुद्धा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.