फोनवर बोललो आणि काही मिनिटांत मृत्यू!

ट्विशा शर्माच्या वडिलांचा धक्कादायक दावा

    दिनांक :18-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Twisha Sharma's Father's Shocking Claim ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून, कुटुंबीयांनी न्यायासाठी मोठी कायदेशीर लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी सासूला मिळालेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात कुटुंबीय आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. या संपूर्ण प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींचा दबाव असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुलीशी त्यांचे शेवटचे संभाषण १२ तारखेला झाले होते आणि अवघ्या काही मिनिटांनंतर तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, वारंवार संपर्क साधूनही बराच वेळ फोन उचलला गेला नाही. नंतर सासूकडून मृत्यूची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचा त्यांचा दावा आहे.
 
 

Twisha Sharma 
 
कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, सुरुवातीला पोलिसांनी योग्य प्रकारे तक्रार नोंदवली नाही आणि अनेक स्तरांवर अडथळे निर्माण करण्यात आले. घटनास्थळी दिसलेली परिस्थिती आणि शवविच्छेदन अहवालातील माहिती यामध्ये मोठा फरक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
 
ट्विशाची आई रेखा शर्मा यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी केली असून तपास स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी पंतप्रधान, महिला आयोग आणि भारताचे सरन्यायाधीश यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रातही मोठी चर्चा सुरू झाली असून ट्विशा शर्मा यांच्या मृत्यूमागील सत्य समोर आणण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.