अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मालेगाव, 
accident : मालेगाव अकोला रोडवरील डही फाट्याजवळ आज, १८ मे रोजी दुपारी २.३० ते २.४५ वाजतादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
 
 
J
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील गणेश गोपाल जगदाळे (वय २७) हे आपल्या एमएच २८ बीव्ही २५३४ या क्रमांकाच्या मोटरसायकलने अकोल्याकडे जात होते. दरम्यान, मालेगाव अकोला रोडवरील डही फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गणेश जगदाळे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती डायल ११२ वर प्राप्त होताच मालेगाव पोलिस ठाण्यातील शिपाई नागनाथ देवळे, निरंजन गुंडजवार तसेच चालक पवन भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी गणेश जगदाळे यांना रुग्णवाहिकेद्वारे प्रथम मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.