मोदी इफेक्ट...अनावश्यक सोने खरेदीला लागला ब्रेक!

    दिनांक :18-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Unnecessary Gold Purchases पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर देशातील सोन्याच्या खरेदीच्या प्रवृत्तीत लक्षणीय बदल दिसत असल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. ‘लोकल सर्कल्स’च्या अहवालानुसार, सोन्याची खरेदी करणाऱ्या सुमारे ६१ टक्के लोकांनी पुढील एक वर्षासाठी अनावश्यक सोने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतामध्ये सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. वाढत्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण होत असून, जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात सरकारकडून यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच कारणामुळे पंतप्रधानांनी परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांना सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते.
 
 
 
Gold Purchases

सोने सुरक्षित गुंतवणूक असल्याची धारणा
अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारताने सुमारे ७१.९८ अब्ज डॉलर इतक्या किमतीचे सोने आयात केले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्यांनी जास्त आहे. जरी सोन्याच्या प्रमाणात थोडी घट दिसली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीमुळे आयातीचे एकूण मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याच काळात सोने आणि चांदीची एकूण आयात १०२.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांपैकी काहींनी सोने खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला असून मोठ्या संख्येने लोकांनी पुढील काही काळ खरेदी टाळण्याची भूमिका घेतली आहे. काही लोक मात्र परंपरा आणि गरजेनुसारच सोने खरेदी सुरू ठेवणार असल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे. अनिश्चित आर्थिक परिस्थितीत सोने ही सुरक्षित गुंतवणूक असल्याची धारणा अजूनही काही ग्राहकांमध्ये कायम आहे.