केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन विराजमान

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तिरुवनंतपुरम,
V.D. Satheesan as CM of Kerala केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये उत्साहात पार पडला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत व्ही. डी. सतीशन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजकीय प्रवासात साधेपणा आणि लोकांशी थेट संवाद ही ओळख असलेल्या व्ही. डी. सतीशन यांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1990 च्या दशकात त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी संघर्षाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सतीशन यांनी केरळ उच्च न्यायालयात वकिली करतानाच राजकारणातही आपला प्रभाव वाढवला.
 
 
 
CM of Kerala
सतीशन यांच्या नेतृत्वशैलीची चर्चा नेहमीच होते. साधे राहणीमान, कार्यकर्त्यांशी जवळीक आणि जमिनीवरचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही लहानपणापासून त्यांच्यात नेतृत्वगुण असल्याचे सांगितले आहे.दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत नव्या मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला. 20 सदस्यीय मंत्रिमंडळात काँग्रेस तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मानले जात आहे. यावेळी व्ही. डी. सतीशन यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी थिरुवनचूर राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली, तर शनिमोल उस्मान यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आमदार अपू जॉन जोसेफ यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.