नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर!

स्वाती चिटणीस, दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई,
drama-awards-announced : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिवर्षीचे प्रतिष्ठित नाट्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ जून रोजी होणाऱ्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 
AWARD
 
 
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १४ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे. या वर्षी व्यावसायिक नाट्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून प्राजक्त देशमुख (‘करुणाष्टके’) यांची निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अमेय दक्षिणदास (‘कुटुंब किर्रर्रतन’) यांना मिळाला असून याच नाटकाला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकाचा मान मिळाला आहे. संकर्षण कऱ्हाडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, पर्ण पेठे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आनंद इंगळे यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि चेतना भट यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
तांत्रिक विभागात ऋतुजा बोठे (नेपथ्य), किशोर इंगळे (प्रकाशयोजना) आणि अजित परब (पार्श्वसंगीत) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. अमेय धोपटकर यांना युवा नाट्य पुरस्कार तर समृद्धी कुलकर्णी यांना विशेष अभिनयासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
संगीत नाट्य विभागात ‘बोलविता धनी’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ओंकार प्रभुघाटे आणि संपदा माने यांना गायक अभिनेता व अभिनेत्री म्हणून गौरविण्यात येणार आहे.
प्रायोगिक नाट्य विभागातही विविध नाटक, कलाकार व तंत्रज्ञांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा सोहळा सर्वांसाठी विनामूल्य असून नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.