यवतमाळचा सुपुत्र प्रकुलगुरूपदी..!

डॉ. अखिलेश पेशवे यांच्यावर नागपूर विद्यापीठाची धुरा

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
akhilesh-peshwe : यवतमाळचे सुपुत्र तथा धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
 
 
y19May-Akhilesh-Peshave
 
 
 
कुलगुरूपदी डॉ. मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रकुलगुरूपदाची निवड काही महिन्यांपासून रखडली होती. अखेर राज्यपाल कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली. व्यवस्थापन परिषदेत डॉ. अखिलेश पेशवे यांच्या नावाला सर्वानुमते पाठिंबा मिळाला.
 
 
डॉ. पेशवे सध्या धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आर. एस. मुंडले धरमपेठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य म्हणून काम केले आहे.
 
 
डॉ. अखिलेश पेशवे यांनी इंग्रजी वाङ्मय विषयात एमए केल्यानंतर एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊन एमएड पदवी संपादन केली आणि नागपूर विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली. शैक्षणिक, प्रशासकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात त्यांची ठळक ओळख असून ते भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांताध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
 
 
विशेष म्हणजे, डॉ. अखिलेश पेशवे यांचा जन्म यवतमाळला झाला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण येथील विवेकानंद विद्यालयात झाले. ते अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वसंत पेशवे यांचे सुपुत्र आहेत. यवतमाळच्या हनुमान आखाड्यात त्यांनी घाम गाळला असून ते उत्कृष्ट कबड्डी आणि व्हॉलीबॉलपटू म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आनंदाची लाट आहे.